प्रयागराज कुंभमेळ्यात सोशल मीडियावर अमाप प्रसिद्धी मिळवलेल्या मोनालिसा भोसलेची चर्चा मार्च महिन्यात तिच्या लग्नामुळे रंगली होती. आता तिच्या वक्तव्यांमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. मला आणि माझ्या नवऱ्याला म्हणजेच फरमानला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि माझ्या जिवाला धोका आहे असं मोनालिसा भोसलेने म्हटलं आहे.
मोनालिसा भोसलेचे आरोप काय?
माझ्या जिवाला धोका आहे. मध्य प्रदेशात आल्यास आम्हाला कापून टाकू, गोळ्या झाडून ठार करु अशा धमक्या दिल्या जात आहेत. मला सांगितलं जातं आहे की तू एका दहशतवाद्याशी लग्न केलं आहेस. माझ्या वडिलांपासून मला धोका आहे. खरंतर माझ्या आणि फरमानच्या लग्नाला ते उपस्थित होते. पण अचानक त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यांनी हा खोटा आरोप केला की माझं अपहरण करण्यात आलं. माझं वय कमी आहे असंही त्यांनी सांगितलं. मग वडील मला घेऊन केरळला का आले? मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे आणि मी १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र मला आता पोलीस सुरक्षेची गरज आहे कारण माझ्या जिवाला माझ्या वडिलांपासूनही धोका आहे. माझ्या बँक खात्यात जे पैसे होते ते माझ्या आई वडिलांनी काढून घेतले आहेत. आम्ही कसं जगतो आहोत ते आमचं आम्हाला ठाऊक आहे असंही मोनालिसाने म्हटलं आहे आणि वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.माझी आई आज कॅमेरासमोर नाटक करते आहे की माझ्या मुलीला पळवून नेलं. तिला धर्माच्या जाळ्यात ओढलं. वस्तुस्थिती ही आहे की फरमानने जेव्हा बाईक घेतली होती तेव्हा माझ्या आईने पेढे वाटले होते. आता ती आईच माझ्यावर आणि फरमानवर आरोप करते आहे. माझं फरमानवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशी लग्न करणार आहे हे मी आईला सांगितलं होतं. पण तेव्हा आईने कुठलाच आक्षेप घेतला नाही. आता तिला अचानक माझ्यासाठी रडू येतं आहे, माझी काळजी वाटते आहे. आमच्या लग्नाला केरला स्टोरी म्हटलं जातं आहे. लव्ह जिहाद म्हटलं जातं आहे पण मला यापैकी कुठल्याही गोष्टी माहीतच नाही असंही मोनालिसाने सांगितलं आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.


