अहिल्यानगर –कपड्यांच्या व्यवसायात असलेल्या पुणे येथील एका व्यापार्याची तब्बल 45 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल दत्तात्रय येमुल (वय 44, रा. टिळक रस्ता, अवंती रेसिडेन्सेस, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. त्यांनी सोमवारी (13 एप्रिल) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या आत्याचा मुलगा प्रशांत राजाराम बल्लाळ (रा. बालिकाश्रम रस्ता), राजेंद्र कराळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), आदित्य रमेश परदेशी (पत्ता माहिती नाही), रमेश परदेशी (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अमोल येमुल हे पेशवाई श्रीमंत या नावाने कपड्यांचा व्यवसाय करत असून पुण्यासह अहिल्यानगर येथे त्यांच्या दुकानाच्या शाखा आहेत. सर्जेपुरा (अहिल्यानगर) येथील शाखा त्यांनी 13 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू केली होती. सदर शाखेच्या कामकाजासाठी त्यांनी त्यांच्या आत्याच्या मुलगा प्रशांत बल्लाळ याची मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती. तसेच राजेंद्र कराळे याला विभागीय व्यवस्थापक, आदित्य परदेशी व त्याचे वडील रमेश परदेशी यांना बिलिंग विभागात नेमले होते. येमुल यांच्या म्हणण्यानुसार, दुकानातील सर्व व्यवहारांचे ऑनलाइन रेकॉर्ड पुण्यातील मुख्य सर्व्हरशी जोडलेले होते. दरवर्षी 31 मार्च रोजी स्टॉक तपासणी केली जात असली, तरी करोना काळात (2020 व 2021) ती होऊ शकली नाही. त्यानंतर 2022 व 2023 मधील स्टॉक तपासणीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. विशेषतः 2023 मध्ये सुमारे तीन हजार 600 नग माल कमी असल्याचे निदर्शनास आले, ज्याची किंमत अंदाजे 45 लाख रूपये आहे.
रेकॉर्ड तपासल्यावर संबंधित कर्मचार्यांनी संगनमताने ग्राहकांना ऑफलाइन पध्दतीने डुप्लिकेट बिले तयार करून ती ऑनलाइन सिस्टीममध्ये नोंद न करता रोख रक्कम स्वतःकडे ठेवून अपहार केल्याचे समोर आले. हा गैरप्रकार जुलै 2021 पासून सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 28 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदारांनी प्रशांत बल्लाळ याच्याकडे चौकशी केली असता, त्याने समाजातील काही व्यक्तींसमोर गैरव्यवहाराची कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच तडजोडीअंती 12 लाख रूपये परत देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी 3.5 लाख रूपये परत करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.


