राहुरी-पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी दुचाकीवर रस्त्याने जात असलेल्या शिक्षिकेचा विनयभंग करून धारदार शस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण तोडुन धुम स्टाईलने चोरी केल्याची घटना राहुरी शहर हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावरील सूत गिरणी समोर घडली आहे. राहुरी शहरातील एका खाजगी शाळेत एक 27 वर्षीय महिला शिक्षिका व त्यांची मैत्रिण 24 एप्रिल रोजी दुपारी शाळेचे कामकाज उरकून दुचाकीवरून राहुरीकडून राहुरी फॅक्टरीकडे जात असताना राजश्री हॉटेलसमोर पाठीमागुन एमएच 17 बीजे 4073 या क्रमांकाच्या दुचाकीवर दोन भामटे आले.
त्यावेळी दुचाकी चालवणारा भामट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शिक्षिकेच्या खांद्याला हात लावुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून गैरवर्तन केले. त्यावेळी दोन्ही शिक्षिकांनी त्यांचेकडे दुर्लक्ष करुन पूढे गेल्या. त्यानंतर एमआयडीसी जवळील सूतगिरणी समोर असताना ते भामटे पुन्हा आले. आणि त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवुन एका शिक्षिकेच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडुन धुम स्टाईलने पसार झाले.
घटनेनंतर सदर शिक्षिकेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 309 (4) प्रमाणे विनयभंग व रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते हे करीत आहे.


