अहिल्यानगरमध्ये आणखी एका मल्टिस्टेटच्या चार शाखेवर छापे; महत्वाची कागदपत्रे, संगणक जप्त

अहिल्यानगर-ध्येय मल्टिस्टेटच्या सुमारे सात कोटी 60 लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी मल्टिस्टेटच्या कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी या शाखेत छापेमारी करून महत्वाचे कागदपत्रे, संगणक तपासकामी जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत. त्यातील व्हा. चेअरमन रोहिदास कवडे याला तोफखाना पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उर्वरीत संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी एका संस्थेची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ऑडिट सुरू करण्यात आले आहे. तपासकामी मल्टिस्टेटच्या विविध शाखेमधील महत्वाचे कागदपत्रे पोलिसांना आवश्यक होती. त्यासाठी निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गायधनी, अंमलदार सुनील शिरसाठ, सुनील खाडे यांच्या पथकाने कर्जत, राशीन, कुळधरण, बिटकेवाडी या शाखेत छापे टाकले. तेथील कॅशबुक, ठेव पावती पुस्तके, अकाउंट रजिस्टर, आवक- जावक रजिस्टर, कर्मचारी हजेरी रजिस्टर, संगणक तपासकामी जप्त केले आहेत. अधिक तपास सुरू आहे.

ध्येय मल्टिस्टेचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी सुमारे 112 ठेवीदारांचे सुमारे पाच कोटी 78 लाख रूपयांच्या अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर फसवणुकीचा अकडा वाढला आहे. सुमारे 184 ठेवीदारांचे सुमारे सात कोटी 60 लाख रूपये अडकले असल्याचे समोर आले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles