अहिल्यानगरमध्ये बोगस खत कारखान्यावर छापा; २२ लाखांची खते जप्त

अहिल्यानगर: कृषी विभागाच्या पथकाने नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई एमआयडीसीमधील खताच्या बोगस कारखान्यावर छापा टाकून २१ लाख ८० हजार रुपये किंमतीचा बेकायदेशीर साठा जप्त केला. यासंदर्भात शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कंपनीच्या मालकावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी या कारवाईची माहिती दिली. काल, सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सुरू केलेली कारवाई आज, मंगळवारी पहाटे २.३० पर्यंत सुरू होती. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने तयार करण्यात आलेले बोगस खताच्या २ हजार ३४ गोण्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत २१ लाख ८० हजार ४८० रुपये आहे. बोगस व अनधिकृत खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यावरील छाप्यामुळे हंगामाच्या पार्श्वभूमीवर खळबळ उडाली आहे. अधिक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करत आहेत.

जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी निलेश अभंग यांना शिंगवेतुकाई येथील कृषी गौरव फर्टीलायझर कंपनीमध्ये बेकायदेशीर खत निर्मिती व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत नियंत्रण निरीक्षक वाल्मीक सुडके, कृषी अधिकारी सुहास धस, कृषी विकास अधिकारी विकास काळे व पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या पथकाने काल रात्री या कंपनीच्या उत्पादन स्थळावर व गोदामावर अचानक छापा टाकला.

कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने गोदामाची झडती घेतली असता तेथे बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या खत कंपन्यांच्या नावे छापलेल्या २ हजार ३४ खतांच्या गोण्या पॅकिंग केलेल्या अवस्थेत आढळलेल्या. पथकाने तेथे उपस्थित ऋषिकेश तुकाराम वाखारे यांच्याकडे बिल बुक, साठा रजिस्टर व इतर अधिकृत कागदपत्रांची मागणी केली. मात्र कोणतीही विहीत कागदपत्रे त्यांच्याकडून सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे साठा बेकायदेशीर असल्याचे उघड झाले. त्यानुसार कंपनीचा मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या पथकाने कारवाईदरम्यान गोदामातून वेगवेगळ्या ९ प्रकारच्या रासायनिक खतांच्या गोण्यांमधून तपासणीसाठी नमुने काढून घेतले व ते पंचासमक्ष सीलबंद केले. कृषी विभागाचे संचालक सुनील बोरकर, विभागीय सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles