अहिल्यानगर-‘ईनफिनाईट बिकन फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि ‘मास्टर सिनर्जी एड्युटेक एलएलपी’ या कथित फायनान्स कंपन्यांनी 28 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक परताव्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी सहा गुंतवणूकदारांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी गिरीश खासेराव जगताप (वय 27, रा. भिस्तबाग चौक, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा आणि मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे (पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
2024 मध्ये अहिल्यानगर शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या गुंतवणूक सेमिनारमध्ये अनेकांना 10-12 टक्के परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्यानुसार गिरीश जगताप यांनी 15 मार्च 2025 रोजी 3 लाख रूपये गुंतवले. परंतु, अपेक्षित परतावा मिळाला नाही. वेळोवेळी संपर्क करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फसवणुकीचा उलगडा झाला. जगताप यांच्यासह ऋषिकेश खामकर (5 लाख), तुषार यादव (5 लाख), दिनेश नन्नवरे (5 लाख), मंगेश लोहकरे (5 लाख), विजय गुळवणे (5 लाख) – अशा सहा गुंतवणूकदारांनी एकूण 28 लाखांची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.
एजंट म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस दलातील अनेक कर्मचार्यांनीच खात्यातील इतरांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं असल्याचे समोर आले आहे. पोलीस दलात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पोलीस दलातील अनेकांनी विश्वासाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, मात्र कंपनीचे संचालक पसार झाल्याने पैसे कोणाकडे मागायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या कंपनीसाठी काम करणार्या पोलीस दलातील एजंटांनी स्वत:ची पोतडी भरली, पण गुंतवणूकदार पोलिसांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केल्यावर त्यांना फक्त आश्वासनं दिली जात आहे.


