Wednesday, November 12, 2025

जिल्हा परिषद पंचायत समिती गट, गण रचनेत राजकीय हस्तक्षेप ; खासदार निलेश लंकेंची मोठी मागणी

गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहिल्यानगर : प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना २०१७ साली अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरुपात कायम ठेवावी, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, २०१७ साली ज्या गट व गण रचनेच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडल्या, त्या रचनेमध्ये त्यानंतर कोणताही नविन गट अथवा गण समाविष्ट करण्यात आलेला नाही. परिणामी, नव्याने कोणतीही फेररचना करण्याची आवश्यकता नाही.

या निवेदनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला येऊन चिंता व्यक्त केली आहे की, गट व गण रचनेच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेवर व निष्पक्षतेवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे गट व गण रचनेत कोणतेही बदल न करता ती २०१७ मधील जुन्याच स्वरुपात ठेवावी, ही ठाम मागणी करण्यात आली आहे.

खासदार लंके यांनी असा दावा केला आहे की, गट व गण रचनेत कोणताही बदल न केल्यास जिल्ह्यातील सामाजिक समता व राजकीय स्थैर्य टिकून राहील. कोणत्याही वर्ग अथवा गटावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या स्थितीत पारदर्शक आणि न्याय्य निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी प्रशासनाने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles