केडगाव येथे तलवार-लोखंडी कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्यास अटक; कोतवाली पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर,: कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव येथे तलवार व लोखंडी कोयता जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपीकडून तलवार व कोयता जप्त करून भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे अंमलदार वट सावित्री पौर्णिमा अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना 26/06/2026 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केडगाव देवी मंदिरामागे समतानगर येथे एक इसम हातात तलवार घेऊन दहशत करीत असल्याची माहिती दिली.
मजुरी करणारा तरुण ताब्यात
पोसई गणेश देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सोमनाथ राजेंद्र गंगतीरे वय 27 रा. समतानगर, केडगाव देवी मंदिरामागे हा तेथे आढळला. त्याच्या राहते घराबाहेर झडती घेतली असता एक तलवार व लोखंडी कोयता मिळून आले. त्यास ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे मार्गदर्शन
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोहेकॉ/1 राहुल शिंदे करीत आहेत.


