लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तेलंगणातील तरुणीची तक्रार,नगर येथील युवकावर गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अश्लील फोटो-व्हिडिओंची धमकी देत तरुणीची फसवणूक, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.
निष्पक्ष तपास करून आरोपीला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्याची पिडितेची मागणी.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी जवळीक साधत तिची फसवणूक करणे, व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील संभाषण करण्यास भाग पाडणे तसेच अश्लील फोटो आणि व्हिडिओंची मागणी करून मानसिक छळ केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, तक्रारदार तरुणी ही मूळची तेलंगणा राज्यातील असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. मार्च २०२४ मध्ये मोबाईलद्वारे तिची ओळख अहिल्यानगर येथील आयुष दीपक मेहर याच्याशी झाली. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे मोबाईल व व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संवादात रूपांतरित झाली.
तक्रारीनुसार, आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वारंवार व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यासाठी दबाव टाकला. तसेच तिच्याकडे अश्लील फोटो, वैयक्तिक छायाचित्रे आणि व्हिडिओंची मागणी करून मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये तरुणीने अश्लील फोटो पाठविण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणी आरोपीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आली. आरोपीच्या वडिलांकडे चौकशी केली असता सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नंतर आरोपीचे दुसरीकडे लग्न निश्चित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.
या तक्रारीच्या आधारे संबंधित पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक, अश्लील संभाषण, अश्लील संदेश व फोटोची मागणी करून मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी तपासादरम्यान देशाबाहेर पळून जाऊन कायद्यापासून बचाव करण्याची शक्यता असल्याची भीती पीडितेने व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातील, विशेषतः मुंबई व पुणे विमानतळावरील विमानतळ प्राधिकरण आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन आरोपीला तपास पूर्ण होण्यापूर्वी देशाबाहेर जाण्यापासून रोखावे, अशी मागणी तिने केली आहे.
यासंदर्भात पीडितेने पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन आरोपीविरोधातील तपास गांभीर्याने व निष्पक्षपणे करण्याची मागणी केली आहे. तसेच टोफखाना व भिंगार पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाकडे संवेदनशीलतेने पाहून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

“मी अनेक दिवसांपासून न्यायासाठी संघर्ष करत असून माझी एकच अपेक्षा आहे-या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन मला न्याय मिळावा,” अशी भावना पीडितेने आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles