मनपा निवडणुकीत मत खरेदीसाठी एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्कम सत्ताधाऱ्यांनी वाटली – महानगर प्रमुख काळे यांचा आरोप ;
अहिल्यानगरच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक, आगामी काळ हा अत्यंत भ्रष्ट सत्ता काळ असणार
प्रतिनिधी : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत मत खरेदी केली गेली. प्रत्येक मतासाठी सरासरी दोन ते दहा हजार रुपयां पर्यंतचा रेट सत्तेतल्या तीनही भ्रष्ट पक्षांनी दिला. ही पैसे वाटपाची स्पर्धा एवढी टोकाला गेली होती की त्यातून महायुतीतील युती केलेल्या दोन पक्षांनी युती न केलेल्या तिसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या मुंबईतून आलेल्या आणि शहरातील एका बड्या पदाधिकाऱ्याच्या घरी ठेवलेल्या कोट्यावधी रुपयांची रसद त्यांच्या उमेदवारांना मिळू नये म्हणून प्रशासनाला छापा मारायला लावला. पन्नास खोक्यांच्या घोडे बाजारातून स्थापन झालेल्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांकडून तब्बल एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्कमेला मतं खरेदी करून अहिल्यानगर मनपाची सत्ता काबीज करण्यात आल्याचा गंभीर आरोप, ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे.
ठाकरे सेनेचे मनपा निवडणुकीतील उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच शहर कार्यालयात किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतील सत्ताधारी पक्षांकडून झालेले प्रचंड पैसे वाटप, केलेली मत खरेदी, निवडणूक यंत्रणेकडून नियम धाब्यावर बसवत गैरमार्गाने सत्ताधाऱ्यांना करण्यात आलेली मदत, मतमोजणीच्या दिवशी उमेदवारांच्या गैरहजेरीत ईव्हीएम मशीनचे सील तोडून सुरू केलेली मतमोजणी, त्यावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली अरेरावी यासह निवडणूक काळात आलेल्या अनेक अनुभवांचा पाढा बैठकीत वाचला. यावेळी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर देखील उमेदवारांनी तीव्र शंका व्यक्त केली.
निवडणूक आढावा घेतल्यानंतर बोलताना किरण काळे म्हणाले, ज्या उमेदवारांना दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रभागात कोणी ओळखत नव्हतं असे काही नवीन लोक निवडून आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस संरक्षणात सत्ताधाऱ्यांनी पैशांचं वाटप केलं. ज्या उमेदवारांना मागच्या मनपा निवडणुकीत अपक्ष लढतांना हजार पेक्षा जास्त मतं होती त्यांना विरोधी पक्षांच्या चिन्हावर कमी मतं मिळाली. ही गोष्ट ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण करणारी आहे. उमेदवारांच्या गैरहजेरीत ईव्हीएमचे सील तोडून परस्पर सुरू केलेली मतमोजणी अत्यंत बोलकी आहे. जनभावना वेगळीच असताना ईव्हीएम मधून मात्र एक हाती सत्तेचा अनपेक्षित चमत्कार यावेळी अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकां मध्ये मतदारांना पाहायला मिळाला आहे. याचे लोकशाहीवर दुरगामी गंभीर परिणाम होतील, असे काळे म्हणाले.
आजवरच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट निवडणूक :
युतीकडे महापौर पदाचे आठ – नऊ संभाव्य उमेदवार आहेत. महापौर पदासाठी पाच कोटी रुपयांचा भाव फुटल्याची चर्चा शहरात आहे. शंभर कोटींहून अधिक रकमेची उधळण मत खरेदीसाठी केल्यानंतर आणि महापौर पदासाठी कोट्यावधी रुपयांचे टेंडर भरल्यानंतर आगामी काळात मनपाच्या तिजोरीची सत्ताधाऱ्यांकडून दरोडा घालून लूट झाल्या शिवाय राहणार नाही. अहिल्यानगरच्या इतिहासातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक आणि आगामी पाच वर्षांचा काळ हा अत्यंत भ्रष्ट सत्ता काळ असणार असल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला कडाडून विरोध करावा, असे आवाहन यावेळी किरण काळे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
यावेळी पार पडलेल्या बैठकीला उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, डॉ. श्रीकांत चेमटे, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अंबादास शिंदे सर, प्रतीक बारसे, महिला आघाडीच्या उषाताई भगत, शैलाताई लांडे, मनीषाताई पठारे, रूपालीताई गोटीपामुल, अश्विनीताई पाचारणे, संजय कांबळे, दिलदार सिंग बीर, मृणाल भिंगारदिवे, महेश शेळके, इमरान शेख, गणेश आपरे, सुजय लांडे अंबादास गोटीपामुल, किशोर कोतकर, लक्ष्मण साबळे, किशोर पठारे, निलेश लांडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


