अहिल्यानगर महानगरपालिकेत अभियंते, विद्युत पर्यवेक्षक, इतर तांत्रिक ४५ पदांची भरती होणार
पदांच्या भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे महानगरपालिकेकडून प्रस्ताव सादर
कामकाजात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पदे भरणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीचा प्रस्ताव टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे पाठवण्यात आला आहे. महानगरपालिकेचा वाढत असलेला आस्थापना खर्च लक्षात घेऊन तांत्रिक दृष्ट्या आवश्यक असणारी अभियंते विद्युत पर्यवेक्षक अशी ४५ पदेच भरण्यात येणार आहेत. बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याशी करारनामाही केला आहे. कामकाजात येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी लवकरच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाल्यापासून आस्थापना खर्च मर्यादेपेक्षा अधिक असल्याने रिक्त पदे भरता आलेली नाहीत. त्यामुळे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे कामकाजातील अडथळा दूर करण्यासाठी अत्यावश्यक असलेली ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ३, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) – १, अभियांत्रिकी सहाय्यक – ८, विद्युत पर्यवेक्षक – ३, लिपीक टंकलेखक – १३, संगणक प्रोग्रॅमर – १, पशुधन पर्यवेक्षक – १ अशी ४५ पदे भरण्यात येणार असून, पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्याशी करारनामाही करण्यात आला आहे. लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.


