भारतामध्ये राजकीय नेते वृद्धापकाळापर्यंत राजकारणात सक्रिय राहतात. राजकीय निवृत्तीनंतर वेगळ्या क्षेत्रात काम करणारे नेते फार कमी आहेत. पण भाजप नेते आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत एक वेगळा विचार मांडलाय. अमित शाह यांनी राजकीय निवृत्तीनंतर काय करणार, याबाबत स्पष्ट सांगितलेय. ते म्हणाले, “मी ठरवले आहे की, निवृत्ती घेतल्यानंतर मी माझा उर्वरित काळ नैसर्गिक शेतीत घालवणार आहे. नैसर्गिक शेती ही एक प्रकारची वैज्ञानिक पद्धत आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत.” विशेष म्हणजे, सध्या अमित शाह नैसर्गिक शेतीच करतात.
आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षानिमित्त गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकार क्षेत्राशी निगडित महिलांसह कार्यकर्त्यांशी बुधवारी अमित शाह यांनी अहमदाबाद येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर आपण शेती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार क्षेत्रातील दृष्टिकोनाचाही उल्लेख केला. अहमदाबाद येथील कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, “निवृत्तीनंतर मी माझा वेळ वेद, उपनिषदांचे वाचन आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करणार आहे.
अमित शाह यांनी या कार्यक्रमात आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले की, गुजरातमधील बनासकांठा आणि कच्छ हे पाण्याच्या कमतरतेने ग्रस्त असलेले जिल्हे होते. लोकांना अंघोळीसाठीही आठवड्यातून फक्त एकदाच पाणी मिळायचे. मात्र, आज सहकारी दुग्धव्यवसायामुळे या भागातील कुटुंबे वार्षिक एक कोटी रुपयांपर्यंत कमाई करतात. हे फक्त सहकार क्षेत्राच्या यशाचे उत्तम उदाहरण आहे.


