मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. तब्बल 20 वर्षांनतर मराठीच्या हक्कासाठी वेगळे झालेले दोन भाऊ एकत्र आले. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट भाग असलेल्या इंडिया आघाडीचं भविष्य काय असेल अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. या सर्व गोष्टींवरती आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. लोक असे विचारतात इंडिया आघाडीचे भविष्य काय? जेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला, त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय? त्याच्यावर माझं उत्तर असं आहे, इंडिया आघाडी जे तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, आम्हाला चांगलं यश मिळालं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली. अनेक नेत्यांसमोर ही खंत व्यक्त केलेली आहे, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उद्धव-राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या लोकांचा दबाव
इंडिया आघाडी विषय हा राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी, लोकसभा, राज्यसभा या संदर्भात आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आम्ही महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडले नाही, आम्ही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातील. आता विषय राहतो महानगरपालिकांचा, त्यासंदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढतील काय? त्यासाठी त्यांची स्थापना नाही, स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं. कधी स्थानिक आघाडी करावी लागते. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकच सांगितलं आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण पाच तारखेला पाहिला असेल, मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, त्यावरती फार चिंंता करण्याचं काही कारण नाही, असंही पुढे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


