अहिल्यानगर पोलीसांचा गुन्हेगारांना इशारा; भाईगिरी, खंडणी खपवून घेतली जाणार नाही
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण विभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल असले 220 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीसांनी पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे त्यांचे विशेष समुपदेशन करून त्यांचे इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेऊन, प्रतिबंधक कारवाईचे बंधपत्राची माहिती घेण्यात आलेली आहे.
श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करण्याचा सल्ला दिला. गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन करतांना, भाईगिरी, गँगवार, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, शस्त्राचा बेकायदेशीर वापर तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधिताविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारची प्रक्रिया तसेच इतर कठोर कायदेशीर उपाय योजना करण्यात येतील तसेच जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी, या उद्देशाने आरोपींना कायद्याचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा पोलीसांनी गुन्हेगाराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून हे विशेष समुपदेशन आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संदेश देण्यात आले आहे.
सदर समुपदेशन विशेष मोहीम श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे आदेशान्वये आयोजित करण्यात आली असून सदर मोहिमेस श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.


