महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात खा.नीलेश लंके यांचा जन आंदोलनाचा इशारा

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात खा. लंके यांचे जनआंदोलन

अहिल्यानगर : प्रतिनिधी

महावितरणच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी येत्या ८ जुलै रोजी अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन लंके यांनी आंदोलनापूर्वीच सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मतदारसंघातील अनेक भागांत सुरू असलेले अघोषित व अनियमित लोडशेडिंग, जळालेले ट्रान्सफॉर्मर (डीपी) वेळेत न बदलणे, स्मार्ट मीटरमुळे वाढीव व चुकीची वीजबिले, अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झालेल्या वीज यंत्रणेची रखडलेली दुरुस्ती, सौरऊर्जा व नेट मीटरिंग प्रकरणांतील विलंब, तक्रार निवारण यंत्रणेचे अपयश, कृषी वीजजोडणीतील विलंब आणि देखभालीच्या अभावामुळे निर्माण होणारे वारंवार तांत्रिक बिघाड या प्रमुख प्रश्नांकडे त्यांनी निवेदनातून लक्ष वेधले आहे.

सौरऊर्जा योजनेसाठी पैसे भरूनही अनेक शेतकऱ्यांना एक ते दोन वर्षे सोलर पॅनेल बसवून मिळत नसल्याचा तसेच काही एजन्सीकडून अतिरिक्त रकमेची मागणी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आंदोलनाद्वारे अघोषित लोडशेडिंग तातडीने बंद करणे, जळालेल्या डीपी कालबद्ध पद्धतीने बदलणे, स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलांची उच्चस्तरीय चौकशी करणे, स्मार्ट मीटर सक्तीचे न ठेवणे, अतिवृष्टीग्रस्त वीज पायाभूत सुविधांची त्वरित दुरुस्ती, सोलर व नेट मीटरिंगची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढणे, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि कृषी वीजजोडणीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

स्थानिक पातळीवर वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने जनतेच्या संयमाचा अंत झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांसमवेत ८ जुलै रोजी लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येणार आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles