अहिल्यानगर: जिल्ह्यात मृत, दुबार, स्थलांतर झालेले व शोध लागत नसलेले ८९ हजार ६४३ मतदार आत्तापर्यंत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत (एसआयआर) आढळले आहेत. याची खातरजमा करण्यासाठी ही यादी आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर ८९ हजार ६४३ नावे कमी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान एस आय आर मोहिमेत जिल्ह्यातील ६५.५१ टक्के मतदारांच्या पडताळणीचे (डिजिटायझेशन) काम पूर्ण झाले आहे.
जिल्हा निवडणूक शाखेकडून ही माहिती उपलब्ध झाली. ‘एसआयआर’च्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या. तसेच ८९ हजार ६४३ मतदारांची पडताळणी करण्यासाठी ही यादी ‘बीएलए’ कडे (राजकीय पक्षांचे मतदान केंद्रावरील प्रतिनिधी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीएलओ यांनी केलेल्या पडताळणीमध्ये आत्तापर्यंत ४६ हजार ५०० हजार निधन झालेले, २४ हजार १०१ स्थलांतरित झालेले, ७ हजार ८३२ दुबार नोंदणी झालेले तर ज्यांचा शोधच लागलेला नाही असे २ हजार १६० मतदार आढळले आहेत. अशा एकूण ८९ हजार ६४३ मतदारांच्या शोधासाठी आता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादी दिली जाणार आहे.जिल्ह्यात सध्या ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत. त्यातील २४ लाख ९५ हजार मतदारांच्या पडताळणीचे (डिजिटायझेशन) काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सर्वात आघाडीवर कर्जत तालुका असून तेथील ३ लाख ५ हजार ५२४ मतदारांपैकी २ लाख ६५ हजार ३७२ म्हणजे ७५.७१ टक्के तर सर्वात पिछडीवर नगर शहर (५८ टक्के) आहे. शहरातील ३ लाख १५ हजार २६४ मतदारांपैकी १ लाख ८५ हजार १९३ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
एसआयआर कार्यक्रमासाठी ३ हजार ८३० बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यातील १३ बीएलओ यांनी शंभर टक्के काम पूर्ण केले आहे तर १२४ जणांचे काम सर्वात कमी म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत झालेले आहे. त्यामध्ये श्रीगोंद्यातील २३ व राहुरीतील २२ बीएलओ यांचा समावेश आहे. याशिवाय एसआयआर कार्यक्रमात निष्काळजीपणा केल्याबद्दल कर्जत, नेवासे व पारनेर येथे प्रत्येकी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्वात कमी काम असलेल्या १२४ बीएलओंमुळे नगरचा राज्यातील क्रमांक घसरला आहे.
एसआयआर अभियानासाठी बीएलओ यांच्या मदतीला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३८३० मतदान केंद्राच्या भागात १२ हजार ७४ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भाजपचे ३५९१, अजित पवार गटाचे २२३४, शिंदे गटाचे २०१४, काँग्रेसचे १७६१, शरद पवार गटाचे ७१२, ठाकरे गटाचे १३४३, बसपचे १५, मनसेचे २३ व आपने ८ प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. भाजपने सर्वाधिक प्रतिनिधी नियुक्त केले असले तरी संगमनेर व पारनेरमध्ये भाजपलाही प्रत्येक केंद्रावर प्रतिनिधी नियुक्त करता आलेले नाहीत.
एसआयआर मोहिमेत नगर जिल्ह्यात ६५.५१ टक्के मतदारांच्या डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. नगर जिल्हा नाशिक विभागात सर्वात आघाडीवर आहे. मृत, दुबार, स्थलांतरित व शोध न लागलेल्या ८९ हजार ६४३ नावांची खातरजमा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यादी दिली जाणार आहे. ज्या १४२ बीएलओचे काम कमी आहे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. -सुनील गाढे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा.


