अहिल्यानगर (सचिन कलमदाणे): राज्यात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक सदस्य विधान परिषदेवर जाणार आहे. या जागेसाठी महायुतीमध्येच मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मागील दोन टर्म ही जागा एकत्रित राष्ट्रवादीचे दिवंगत आ.अरूणकाका जगताप यांनी जिंकली होती. त्यांच्या विरोधात एकत्रित शिवसेनेने जागा लढवली होती. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अजितदादांची राष्ट्रवादी व शिंदेंची शिवसेना आता भाजपबरोबर महायुतीत आहे. त्यामुळे नगरची जागा कोणाला सुटणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नगरच्या जागेवर दावा केल्यास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहेत. झावरे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नगरमधील सोधा राजकारणात झावरे पाटील यांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे त्यांनी विधानपरिषदेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील इच्छुक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आ.प्राजक्त तनपुरे सुध्दा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. त्यांनी राहुरीच्या पोटनिवडणुकीवेळी भाजप नेत्यांच्या विनंतीला मान देवून आ.अक्षय कर्डिले यांच्यासाठी माघार घेतली होती. तनपुरेंनी अधिकृतरित्या पक्ष सोडला नसला तरी कोपरगावच्या आ.विबेक कोल्हेंप्रमाणेच भाजप तनपुरे यांचे राजकीय पुनर्वसन करेल अशी त्यांच्या समर्थकांना आहे.
या मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पक्ष एक नंबरला आहे. त्यामुळे विजयाचे गणित भाजपच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. भाजपमधूनही माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भाजपने जागा आपल्याकडे घेतल्यास उमेदवार निश्चितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.


