पारनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
मंगळवारी पारनेर शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले.
रात्री शवविच्छेदन नाही, किटसाठी 5 हजार
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिस प्रशासनाचे पत्र आवश्यक असल्याचे, कर्मचारी उपलब्ध नसल्याचे तसेच शवविच्छेदनासाठी मेडिकल किट नसल्याची कारणे पुढे करण्यात आली. अखेर कर्मचारी बोलावण्यासाठी वाहनखर्च व इतर रकमेची मागणी करण्यात आली. मेडिकल किटच्या नावाखालीही पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली.
‘रॅकेट’ कार्यरत असल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी या प्रकारामागे ग्रामीण रुग्णालयातील कथित रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. “मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखाचा गैरफायदा घेत आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
दीपक लंके यांचा पाठिंबा
आंदोलनाची माहिती मिळताच खासदार नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी रुग्णालयात भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. “मृतांच्या नातेवाईकांवर अशा प्रकारे आर्थिक अन्याय होणे अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
खुर्चीला पुष्पहार, गांधीगिरी आंदोलन
आंदोलनकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिश लोंढे यांनी स्वतः रुग्णालयात येऊन चर्चा करावी, अशी मागणी केली होती. मात्र डॉ. लोंढे यांनी फोनवरून चर्चा करत दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक असल्याने येऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. लोंढे यांच्या भूमिकेचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन केले. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगरसेवक योगेश मते, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, सुभाष शिंदे, राजू शेख, विजय भास्कर औटी, शहराध्यक्ष वैभव औटी, विजय डोळ, राजेंद्र शेरकर, सतीश म्हस्के, राहुल बुगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


