नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला अटक करून एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या तपास एसआयटीकडून केला जात आहे. त्याच्यामागचा चौकशीचा ससेमिरा अद्याप कमी होत नाही. एका गुन्ह्यात कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली की दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीकडून अशोक खरातचा ताबा घेतला जात आहे. त्यामुळे अशोक खरात कायद्याच्या चक्रात अडकला असून दिवसेंदिवस त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
गुरुवारी अशोक खरातला न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कालच एसआयटीने अशोक खरातचा सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतला. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा वाचला. त्याने सहाव्या गुन्ह्यात पीडितेसोबत काय काय केलं? याची माहिती दिली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अशोक खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या सहाव्या गुन्ह्याची माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की, अशोक खरात याने दैवी चमत्काराचा दावा करत आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याच्या नावाखाली तरुणीचा चार वेळा बलात्कार केला आहे. तो पीडितेला गुंगीकारक औषध पाण्यात टाकून प्यायला द्यायचा. त्याने काय पदार्थ खायला दिले? तसेच त्यात कोणतं गुंगीकारक औषध मिसळलं होतं? धार्मिक विधीच्या नावाखाली पैसे उकळले आहे का? याचा शोध घ्यायचा आहे, अशा युक्तीवाद करत सरकारी वकिलांनी आरोपीची 4 दिवसाची पोलीस कोठडी मागितली.
मात्र याला आरोपी खरातच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. ६ गुन्ह्यात तेच पेढे आणि तेच पाणी आहे. त्याचा तपास पुन्हा पुन्हा का करायचा आहे. मला फिर्याद सुद्धा वाचायला मिळाली नाही. आर्थिक अँगल शोधायचा आहे का ? हेतू शोधायचे आहे का ? फसवणूक केली आहे, तर त्याबाबत आरोपीची गरज काय? पोलीस कोठडीत आणि SIT समोर आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद मिळतोय. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असं खरातच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.


