अहिल्यानगर-शहरातील एका प्राथमिक शाळेतील महिला उपशिक्षिकेने शाळेच्या शिपायाविरूध्द विनयभंग, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी (३ सप्टेंबर) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आलमगीर (भिंगार) परिसरात राहणाऱ्या शिपायाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्या अहिल्यानगर येथे आपल्या दोन मुलींसह वास्तव्यास आहेत. सन २०२५ पासून जून २०२६ पर्यंत त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर मुख्याध्यापकपदी नवीन नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी पदाचा कार्यभार अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी शाळेच्या कार्यालयाला कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कुलूप लावण्यात आले होते. याबाबत त्यांनी शाळेतील शिपायाकडे विचारणा केली असता, सचिव व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाचा ताबा नवीन मुख्याध्यापकांकडे दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित शिपाई वारंवार मूळ सर्व्हिस बुकची मागणी करत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
महिला उपशिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, कार्यालय बंद असल्याने सर्व्हिस बुक देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर संबंधित शिपाईने त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. सर्व्हिस बुक द्यावेच लागेल, तुम्ही कसे देत नाही ते मी पाहतो. तुम्ही घरी दोन मुलींसोबत राहता, तुमचे काही खरे नाही, अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुरूवारी दुपारी त्या शाळेत असताना संबंधित शिपाई पुन्हा त्यांच्या जवळ आला. त्याने सर्व्हिस बुक देण्याची मागणी करत हुज्जत घातली, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.


