अहिल्यानगर-मुंबई येथील घराचे थकीत गृहकर्ज एकरकमी मिटवून देण्याचे आमिष दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तोतया वकिलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अंबादास पवार (वय २०, रा. पोलीस मुख्यालय, सर्जेपुरा, अहिल्यानगर) याच्या सायन कोळीवाडा, मुंबई येथील घराचे बँकेतील गृहकर्ज आर्थिक अडचणींमुळे थकीत होते. दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात विवेकची ओळख महेश रावसाहेब चव्हाण (रा. वाशी, नवी मुंबई) याच्याशी झाली होती.
त्यानंतर विवेक कामानिमित्त अहिल्यानगर येथील माळीवाडा बस स्थानक येथे आला असताना, महेश याने त्याला संपर्क साधला. “मी वकील असून तुमच्या घराच्या कर्जाची बँकेसोबत एकरकमी तडजोड करून देतो,” असा बनाव त्याने रचला. या कामासाठी त्याने पैशांची मागणी केली.
विवेकने त्याच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या तारखांना एकूण दोन लाख रुपये बँक खात्यातून ऑनलाईन पाठवले. पैसे मिळाल्यानंतर महेश याने काम सुरू असल्याचे सांगत सतत वेळ मारून नेली.
काही दिवसांनी त्याने विवेकचे दूरध्वनी उचलणे बंद केले आणि संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवेक पवार याने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी महेश चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.


