अहिल्यानगर-शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तागड वस्ती येथे महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला स्वयंपाकाचे काम करण्यासाठी परिसरात गेल्या असताना सोनिया घोडके व वृषाली तांदळे यांच्यात जागेच्या बांधकामावरून वाद सुरू होता. हा वाद शांत करण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी वृषाली तांदळेने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद अधिक चिघळल्यानंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करत आहेत
महिलेला मारहाण; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
सायकल पार्किंग व झाडांच्या कुंड्यांवरून झालेलया वादातून पती-पत्नीने एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र तागड व अनिता तागड असे गुन्हा दाखल झालेलया दांपत्याची नावे आहे. फिर्यादी महिला आपल्या घरात असताना आरोपी पतीने घरासमोरील इलेक्ट्रिक मीटरची पाहणी केली. तसेच यावेळी सायकल पार्किंगबाबत विचारणा केली असता, आरोपीने संतापाच्या भरात महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने मारहाण केली. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने देखील पीडित महिलेला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


