नाशिकच्या आयटी कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान गायब होती. पोलीस तिचा शोध घेत होते. निदा खान हिला लपवण्यात एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर हे सर्व आरोप जलील यांनी फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे आता याच प्रकरणावर माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यांनीही जलील यांच्यावर आरोप केले असून एमआयएम पक्षावर थेट बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच त्या भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासूनच राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोपही खैरे यांनी केला. तसेच एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.दुसरीकडे नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणी अटक केलेल्या निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. निदा खान ही संभाजीनगरमध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलील व एमआयएम नगरसेवकाची, पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणीदेखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते.


