राहाता: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज, गुरुवारी दिल्लीत भेट घेवून अहिल्यानगर जिल्ह्याच्या भेटीचे निमंत्रण तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभास वेळ देण्याची विनंती केली.
दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री विखे-पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष पदावर झालेल्या निवडीनंतर पहिलीच भेट असल्याने अध्यक्ष नितीन नबीन यांचा सत्कार करून अभिनंदन केले. सहकार चळवळीचे जनक स्व. डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचे ‘पायोनियर’ जीवनचरित्र त्यांना भेट दिले. राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्या विजयाची माहिती देवून पक्षाने केलेल्या कामगिरीची माहिती भेटीदरम्यान मंत्री विखे यांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नितीन नबीन यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करायचे आहे. याचे निमंत्रण भेटी दरम्यान दिले असून, लवकरच वेळ देण्याचे त्यांनी मान्य केल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. भाजपच्या केंद्रीय कार्यालयात मंत्री विखे यांनी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली. त्यांनाही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाची माहीती दिली. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच अन्य केंद्रीय पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.


