अहिल्यानगर जिल्ह्यातील सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त;सहकार विभागाचा निर्णय

पारनेर-तालुक्यातील करंदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कारभाराबाबत सहकार विभागाने मोठा निर्णय घेत संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केले आहे. संचालकांच्या सामूहिक राजीनाम्यांमुळे संचालक मंडळाची गणपूर्ती होत नसल्याने संस्थेचा कारभार ठप्प झाल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78-अ (1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या कारभारासाठी सहकार अधिकारी राजेंद्र वाघमोडे यांची सहा महिन्यांसाठी प्रशासक (प्राधिकृत अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पारनेर कार्यालयाने 4 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, संस्थेतील सहा संचालकांनी 13 मार्च 2026 रोजी संस्थेतील अनागोंदी कारभाराला कंटाळून राजीनामे दिले होते. त्यामध्ये अरुण भाऊसाहेब चौधरी, चंद्रकांत नामदेव गांगड, सदानंद गणाजी गव्हाणे, भास्कर दिनकर गव्हाणे, संतोष रामभाऊ ठाणगे आणि संभाजी शंकर करंदीकर यांचा समावेश होता. त्यापैकी संभाजी करंदीकर यांनी नंतर राजीनामा मागे घेतला.

याशिवाय, शिवाजी जनाजी ठाणगे यांना कायद्यातील तरतुदीनुसार संचालकपदासाठी अपात्र ठरवत पदावरून कमी करण्यात आले होते. तसेच भटक्या विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्गाची एक जागा रिक्त असल्याने संस्थेतील एकूण सात जागा रिक्त झाल्या होत्या.
सहकार विभागाने संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावत 13 जुलै, 27 जुलै आणि 3 ऑगस्ट रोजी सुनावणीच्या संधी दिल्या होत्या. मात्र, संस्थेच्या वतीने वारंवार मुदतवाढ मागण्यात आली. अखेरच्या सुनावणीसही कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही किंवा समर्पक खुलासा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे संचालक मंडळाकडून प्रभावी कारभार होणे शक्य नसल्याचा निष्कर्ष विभागाने काढला.

सहाय्यक निबंधक विशाल दाते यांनी काढलेल्या आदेशानुसार, संस्थेचे व्यवस्थापन तातडीने प्रशासकांकडे सोपविण्यात येणार आहे. प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेले राजेंद्र वाघमोडे हे पुढील सहा महिन्यांपर्यंत संस्थेचा कारभार पाहतील. तसेच या कालावधीत नवीन संचालक मंडळाची निवड होण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.
करंदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही पारनेर तालुक्यातील जुन्या संस्थांपैकी एक असून, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles