नगर तालुक्यात लोखंडी कत्तीने वार करत दाजी कडून मेव्हण्याचा निर्घृण खून

अहिल्यानगर-बहिण व दाजी यांच्यात सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर लोखंडी कत्तीने तोंडावर, छातीवर आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याची घटना चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली. किरण रोहिदास भोसले (रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा शिवार) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ विक्रम रोहिदास भोसले (वय 40, रा. पिंपळगाव कौडा) यांच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश गुलाब काळे (मूळ रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा; सध्या रा. चिंतामणी डोंगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शनिवारी (19 सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिंतामणी डोंगर परिसरात हा प्रकार घडला. किरण भोसले हे त्यांच्या बहिणी व दाजी यांच्यात सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेले होते. याचा संशयित आरोपी हरीश काळे याला राग आला. त्यातून त्याने किरण यांच्याशी शिवीगाळ व दमदाटी केली. वाद वाढल्यानंतर हरीश याने लोखंडी कत्ती हातात घेऊन किरण यांच्या तोंडावर, छातीवर आणि पोटावर वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात किरण गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती देण्यात आली. नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे, उपनिरीक्षक उमेश पतंगे, नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्ल्याच्या वेळी विना नंबरच्या दुचाकीचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles