अहिल्यानगर -तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी वैदुवाडी (सावेडी) येथे घरझडती घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला महिलांच्या गटाकडून विरोध करण्यात आला. पोलिसांशी धक्काबुक्की व झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा ते सात महिलांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिला पोलीस अंमलदार छाया गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात नितीन मच्छिंद्र शिंदे, विशाल संतोष शिंदे (दोघे रा. वैदुवाडी) याला अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने बुधवारी (8 जुलै) दुपारी अटकेतील दोघांना वैदुवाडी येथे घरझडती व पसार संशयित आरोपी सूरज मच्छिंद्र शिंदे याचा शोध घेण्यासाठी भेट दिली.
पोलीस पथक आरोपींच्या घराजवळ पोहोचताच तेथे काही महिलांनी एकत्र येऊन पोलिसांना विरोध केला. आमच्या माणसांना का अटक केली, तुम्ही तपासासाठी येथे का आला? असा जाब विचारत महिलांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांशी धक्काबुक्की व झटापट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना घरझडती घेता आली नाही तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना बळजबरीने सोडवून नेण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.


