अहिल्यानगर -देहरे (ता. अहिल्यानगर) परिसरात भाजीपाला विक्री करून घरी परतणार्या महिलेवर हल्ला करून तिचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन लुटणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसांत अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी व मोबाईल असा एकूण 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
4 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला दुचाकीवरून भाजीपाला विक्री करून उरलेला भाजीपाला घेऊन घरी परतत होती. देहरे शिवारात दोघांनी तिच्या दुचाकीला लाथ मारून तिला अडविले. त्यानंतर बळजबरीने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला होता. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, ज्योती शिंदे यांचे पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान राहुल विजय निकम याने गुन्हा केल्याची आणि तो त्याच्या साथीदारासह निंबळक रेल्वे फाटकाजवळील धरमपुरी मंदिर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे राहुल विजय निकम (वय 25, रा. वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) व अरूण रावसाहेब बर्डे (वय 21, रा. विळद, ता. अहिल्यानगर) अशी सांगितली. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत दोघांनीही सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.


