अहिल्यानगर -शहरातील मुकुंदनगर भागात व्यवसाय करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला मध्यरात्री फोन करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात स्वयंघोषित नगरसेवक शहाबाज जाफर खान उर्फ बाबा खान आणि शेख सादिक अल्लाबक्ष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नूरमोहम्मद आबिद शेख यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नूरमोहम्मद शेख यांचा सहारा सिटी परिसरात बांधकाम आणि मंगल कार्यालयाचा (हॉल) व्यवसाय आहे.
दि.2 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12.28 वाजेच्या सुमारास बाबा खान याने फोन करून 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास चालू असलेले बांधकाम बंद पाडणे, आंदोलने करणे आणि हॉल पाडण्याचा प्रयत्न करण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच या प्रकरणात शेख सादिक अल्लाबक्ष याने पैशांची व्यवस्था करण्यासाठी दबाव आणल्याचेही समोर आले आहे.
या सर्व प्रकरणामागे कथित पत्रकार भैया बॉक्सर उर्फ इस्माईल अशोक दर्यानी याचा मुख्य सहभाग असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. भैया बॉक्सरवर यापूर्वीही खंडणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी 18 जून 2026 रोजी तक्रारदाराने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे भैया बॉक्सरविरुद्ध हॉल आणि व्यवसायाची बदनामी करत असल्याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा यांनी देखील पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, बाबा खान याची आई काँग्रेस पक्षाची विद्यमान नगरसेविका असून, तिच्या राजकीय पदाचा गैरवापर करत तो स्वतःला नगरसेवक म्हणून भासवत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. उपलब्ध माहितीनुसार बाबा खान याच्यावर कॅम्प, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात मिळून एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक पदाचा असा गैरवापर रोखण्यासाठी तक्रारदार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


