गेल्या काही महिन्यांपासून महावितरणकडून होत असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याचवेळी महानगर गॅसकडून घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची चुकीची आणि अवाजवी बिले मिळत असल्याच्या तक्रारीही ग्राहकांकडून वाढल्या आहेत. याबाबत ग्राहक पंचायतीने थेट अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे कारवाईची मागणी केली. यावर भुजबळ यांनी तातडीने पावले उचलत कार्यवाही सुरू केली आहे.
ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ग्राहक आयोगासह ग्राहकांशी निगडित अनेक मुद्दे मांडले होते. त्यात ग्राहक आयोगाचे सक्षमीकरण, प्रलंबित प्रकरणे जलद निकाली काढणे, ऑनलाइन सुनावणी प्रभावीपणे लागू करणे, ग्राहक आयोगातील अध्यक्ष व सदस्यांची रिक्त पदे भरणे या मागण्या करण्यात आल्या. याचबरोबर महानगर गॅसची चुकीची बिले, महावितरणकडून स्मार्ट मीटर सक्ती, हॉटेलांमध्ये औद्योगिक बर्फाचा वापर, खराब रस्त्यांवरील पथकर वसुली, छापील किंमत कायद्यात सुधारणा, रुग्णालयांकडून अंतर्गत औषध विक्री केंद्रातून औषधे घेण्याची सक्ती, एसटी महामंडळाच्या अधिकृत थांब्यांवर जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री आदी प्रश्न मांडण्यात आले.
यावर मंत्री भुजबळ यांनी कार्यवाहीच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ग्राहकांच्या या समस्या संबंधित विभागांकडे पाठवाव्यात आणि त्या तातडीने सोडवण्यास सांगावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. ते म्हणाले की, महानगर गॅसची चुकीची देयके, महावितरणची स्मार्ट मीटरची सक्ती, खराब रस्त्यांवरील पथकर (टोल) वसुली, प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) स्मार्ट कार्ड वेळेत न मिळणे, छापील किंमत निश्चितीबाबत कायद्यात सुधारणा करणे, रुग्णालयांकडून अंतर्गत औषध विक्री केंद्रातून औषधे घेण्याची सक्ती याबाबतच्या ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना अवगत करावे.


