ग्रामपंचायत अधिकारी संघ जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत गोंधळ
राज्य कार्यकारिणीला जागृत सदस्यांचा तीव्र विरोध; निवडणूक प्रक्रिया स्थगित
अहिल्यानगर – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ, कोल्हापूर जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला. जिल्हाध्यक्ष श्री. कुंडलिक तात्या भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले असून, नव्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी हॉटेल पॅराडाईज येथे राज्य अध्यक्ष श्री. तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती.
संघाच्या घटनेनुसार लोकशाही मार्गाने उमेदवार अर्ज दाखल करणे, मतदार यादी जाहीर करणे, हरकती मागवणे आणि आवश्यकता असल्यास मतदान घेणे अपेक्षित होते. मात्र, ही प्रक्रिया पार पाडण्याऐवजी राज्य कार्यकारिणीने सभासदांचा कौल न घेता बंद दाराआड चर्चा करून थेट नाव जाहीर करण्याचा प्रयत्न केला. या हुकूमशाही पद्धतीला उपस्थित जागृत सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला.
सदस्यांच्या रोषामुळे राज्य कार्यकारिणीला आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि कुठलाही निकाल न लावता जिल्ह्यातून माघार घ्यावी लागली. या घडामोडीत राज्य कार्यकारिणीवर जिल्ह्यातील मतभेद दूर करण्याऐवजी ते अधिक वाढवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा शाखेचे जिल्हा सरचिटणीस पोपट आबाजी रासकर यांनी जाहीर केले की, “सभासदांच्या इच्छांचा सन्मान राखून लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाईल. लवकरच जिल्हाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेबाबत पुढील दिशा जाहीर करण्यात येईल.