अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
लोकभावना येथील दरबार हॉलमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावूक शब्दांत सुनेत्राकाकींचे अभिनंदन केले आहे. ते म्हणतात, “राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राकाकींनी शपथ घेतली, याचा नक्कीच आनंद आहे. खरं सांगायचं तर अजितदादांची जागा जगात दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. पण सुनेत्राकाकींच्या रूपात आम्ही किमान तिथं दादांना पाहू शकू, हाच एक आधार आहे. सध्या आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आम्ही सर्वजण शोकाकूल आहोत. अशा परिस्थितीत त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हेच समजत नाहीये.
युगेंद्र पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुनेत्राकाकी अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय अजितदादांनी ज्या निर्धाराने, कर्तव्यनिष्ठेने आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राची सेवा केली, त्याच मूल्यांवर आपणही वाटचाल कराल आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान द्याल, हा विश्वास आहे.


