पारनेर येथील सेनापती बापट मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या अपहार प्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कर्जदाराला अटक केली आहे. महेंद्र साईनाथ मंडलीक (वय 44, रा. शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या कर्जदाराचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवस (13 एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सुभाष अश्रुजी आंग्रे (वय 75, रा. अळकुटी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळातील सदस्य यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींनी फिर्यादीसह इतर ठेवीदारांना जास्त व्याजदाराचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारून सुमारे दोन कोटी 50 लाख 38 हजार 613 रूपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, सदरचा गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. पोलिसांनी ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले असून अपहाराची रक्कम सुमारे सहा कोटींवर पोहचली आहे. या गुन्ह्यात महेंद्र मंडलीक याचा सहभाग निष्पन्न झाला असून त्याला गुन्ह्यात संशयित आरोपी करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, मंडलीक याने सेनापती बापट मल्टीस्टेट सोसायटीच्या संचालक मंडळाशी संगणमत करून सोसायटीच्या मालकीच्या सुपा एमआयडीसीतील प्लॅट व सुर्यतारा नावाची कंपनी विकत घेतल्याचे तसेच सदर खरेदीसाठी सेनापती बापट संस्थेतूनच कर्ज घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच त्याने सदर कर्जाची परतफेड न करता पुन्हा तीच मालमत्ता तारण देवून अॅक्सीस बँकेकडून सात कोटी पेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेतले असल्याचे निष्पन्न झाल्याने मंडलीक याला संशयित आरोपी करून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
या गुन्ह्यात चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ संशयित आरोपी आहेत. मात्र, ज्या कर्जदारांनी कर्ज घेतले आहे व त्यांनी परतफेड केली नाही अशा कर्जदारांना या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.


