अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ‘डेंगू मुक्त अभियान’ राबविले
पाईपलाईन हडको परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाची विशेष मोहीम
नगरकरांनी सक्रिय सहभाग घ्यावा – आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागांत डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत पाईपलाईन हडको परिसरात शनिवारी विशेष डेंगू मुक्ती मोहीम पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे स्वतः उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने डेंग्यूमुक्ती अभियान हाती घेण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत आयुक्त डांगे यांनी व्यक्त केले.
फक्त पालिकेवर अवलंबून न राहता, नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आपल्या परिसरातील साचलेले पाणी दूर करणे, कोरडे दिवस पाळणे, झाडाझुडपांची सफाई करणे यासारख्या कृतींत सहभाग नोंदवावा. असे केल्यासच आपण डेंगूसारख्या आजारांपासून बचाव करू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या अभियानात माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आयुक्त डांगे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, डांगे हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून, ते फिल्डवर उतरून स्वतः काम करत असल्याने कर्मचारीही प्रेरित होतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे.
माजी नगरसेविका दीपाली बारस्कर म्हणाल्या की, महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा साथ लाभल्यासच डेंगूचा प्रादुर्भाव रोखता येईल. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, साचलेले पाणी वाहते करावे आणि घरासभोवतालच्या परिसराची नियमित स्वच्छता करावी. हे उपाय सहज असून परिणामकारक आहेत.
आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी यावेळी नागरिकांना डेंग्यूचे लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व तातडीच्या काळजीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी पाण्याची साठवणूक करताना झाकण लावण्याचा, फुलपात्रं दररोज रिकामी करण्याचा, जुन्या टायर, बादल्या यामध्ये पाणी साचू न देण्याचा सल्ला दिला.
यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन औषध फवारणी केली, डेंगूविषयक माहितीपत्रके वितरित केली व स्वच्छतेचे संदेश दिले. डेंगूविरोधात लढा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. महापालिकेच्या या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, इतर उपनगरांमध्येही लवकरच ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


