अहिल्यादेवींच्या जन्मगावी उद्या लेक-जावयांना धोंडे जेवण; विधान परिषद सभापती प्रा. शिंदेंच्या पुढाकाराने अनोखा सोहळा

अहिल्यादेवींच्या जन्मगावी उद्या लेक-जावयांना धोंडे जेवण

विधान परिषद सभापती प्रा. शिंदेंच्या पुढाकाराने अनोखा सोहळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सध्या अधिक मास सुरू असून, यानिमित्त लेक-जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची व त्यांच्यासाठी पुरणाचे धोंडे करण्याची परंपरा मराठी कुटुंबीयांतून सुरू आहे. हीच परंपरा आख्ख्या गावासाठी साजरी करण्याचा अनोखा सोहळा उद्या रविवारी (14 जून) चौंडी (ता. जामखेड) येथे सकाळी 9 वाजता होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने हा आगळावेगळा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी गावातील लेक-जावयांचा सन्मान व त्यांच्यासाठी धोंडे जेवण सोहळा होणार असून, अशा पद्धतीने एखाद्या गावाचा धोंडे जेवण सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
या कार्यक्रमाची माहिती देताना सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले की, चौंडी नगरीतील लाडक्या लेक-जावयांचा धोंडे जेवण व सन्मान सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसून गावातील विविध कुटुंबातील लेकी आणि जावई यांच्याप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान व्यक्त करणार्‍या आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा एक आगळावेगळा उत्सव आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन जन्मभूमीत आयोजित या स्नेहसोहळ्यात सहभागी होऊन आपल्या संस्कारांचा, नात्यांचा आणि परंपरेचा हा सुंदर उत्सव अनुभवावा, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले. उद्या रविवारी, (दि. 14 जून) रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे सकाळी 9 वाजता हा सोहळा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 व्या जयंती व अधिक मासानिमित्त चोंडी नगरीतील लेकी आणि जावयांचा धोंडे जेवण सन्मान सोहळा उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 9 वाजता लेक जावयांचे चोंडी येथे आगमन झाल्यानंतर जावयांना फेटा बांधण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लेक-जावयांची स्वागत मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 10 वाजता अहिलेश्वर मंदिर येथे लेक-जावयांचे आगमन व दर्शन होणार आहे. तेथेच सर्वांचे एकत्रित स्मरणीय समूह छायाचित्रण केले जाणार आहे. त्यानंतर माणकोजीराव शिंदे सभागृहात मुख्य सोहळा होणार आहे. सुरुवातीला प्रतिमा पूजन व सत्कार समारंभ झाल्यावर मार्गदर्शन व मनोगत होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता धोंडे जेवण झाल्यावर लेक-जावयांचा सन्मान व भेट वस्तू वाटप होणार आहे. चौंडी ग्रामस्थांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, यात चौंडीच्या लेक-जावयांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles