मोदींच्या १२ वर्षांच्या नेतृत्वाने भारताची जगभरात उंचावली मान; लोहसरमध्ये कर्डिलेंकडून स्वच्छता अभियान ; पंतप्रधान मोदींच्या तपपूर्ती निमित्त भाजपाचा अनोखा उपक्रम; पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांतील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताला जागतिक पटलावर नवी ओळख मिळाली ; आमदार अक्षय कर्डिले
अहिल्यानगर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथे भाजपाच्या वतीने तपपूर्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आमदार अक्षय कर्डिले यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांच्या कार्यकाळात भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक भक्कम आणि प्रभावी झाल्याचा दावा केला. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताला जागतिक पटलावर नवी ओळख मिळाली आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी आणि विकासाभिमुख योजनांमुळे देशाला प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे असे प्रतिपादन आमदार कर्डिले यांनी केले
तपपूर्ती कार्यक्रमानिमित्त श्री काळभैरवनाथ मंदिरात आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लोहसर गाव परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास माजी सभापती संभाजी पालवे, भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, सरपंच अनिल गीते पाटील, माजी सरपंच सुनील साखरे, सुरेश चव्हाण, धीरज मैड, गणेश पालवे, किरण गर्जे, भैया बोरुडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे पाथर्डी तालुक्यातील ३९ गावांमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.


