गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. ऑपरेशन टायगरची सुरू असलेली चर्चा आज थांबली आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडून खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र पाठवले जाणार आहे
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष तर काही खासदार ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मात्र त्यानंतर 6 खासदार फुटल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने व्हीप जारी करत बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला या 6 खासदारांनी दांडी मारली होती. त्यामुळे या खासदारांना कारणे दाखवा नाटीस जारी करण्यात आली होती. मात्र एकाही खासदाराने या नोटीशीला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता या खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत पावले उचलली जाणार आहे.
आता बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे, याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिल्याने या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे आता या खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय
- Advertisement -


