15 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार जिल्हा बँकेची प्रारूप मतदार यादी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मतदार यादीची मान्यता आणि दुरुस्तीसाठी नगर ते नाशिक असा प्रवास सुरू होता. आता हे काम पूर्ण होत आले असून, येत्या आठवड्यात (15 ऑगस्टपर्यंत) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता सहकार विभागाच्या सुत्रांनी वर्तवली आहे.

जिल्ह्यातील विविध सहकारी सोसायट्यांकडून प्राप्त झालेल्या ठरावांनुसार जिल्हा बँकेने 5 हजार 890 मतदारांची प्राथमिक यादी नगरच्या सहकार विभाग (जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे) सादर केली. त्यानंतर त्यात जिल्हा पातळीवर सुधारणा करून करून ठरावांची यादी विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी (नाशिक) यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवली होती. या मतदार यादीचीसहकार विभागाने अतिशय काटेकोर पडताळणी केली आहे. यामध्ये सुरू असलेल्या सहकारी संस्थांची नावे कायम ठेवण्यात आल्या असून अकार्यक्षम, बंद पडलेल्या किंवा नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची नावे वगळण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. सहकार विभागाच्या छाननीनंतर यंदाच्या निवडणुकीत मतदारांची संख्या घटून ती सुमारे 3 हजार 700 वर येण्याची शक्यता आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सभासद संस्थांना 16 जुलैपर्यंत ठराव पाठवण्याची मुदत देण्यात आली होती. प्राप्त ठरावांची तालुकानिहाय यादी तयार करून आठ ते दहा दिवसांपूर्वी नाशिक कार्यालयात सादर करण्यात आली. मात्र, तेथे काही तांत्रिक आक्षेप घेण्यात आल्याने, कागदपत्रांची पूर्तता करून यादी पुन्हा दुरुस्तीसाठी नगरला पाठवण्यात आली. नगर येथील यंत्रणेने सर्व त्रुटी दूर करून ही सुधारित यादी पुन्हा नाशिकला पाठवली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे जाहीर होईल, असा अंदाज बँक प्रशासन आणि नगरच्या सहकार विभागाच्यावतीने वर्तवण्यात आला आहे.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवून सुनावणी घेतली जाईल. त्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारण महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. साधारणपणे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. याच काळात परतीच्या पावसाचा जोर वाढल्यास निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles