महापालिका कंत्राटदार संस्थेच्या कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांना करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कापड बाजार परिसरात तणाव निर्माण झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कुटुंबाचा आधार हिरावला! मुकुंदनगर हल्ल्यात धीरज परदेशी यांचा दुर्दैवी अंत
अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन झाले.पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेप्रकरणी महापालिकेतील वायरमन युनूस शेख याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? तपासातून आता काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


