अहिल्यानगर-लेबर वॉचमनचा पगार देण्यासाठी गेलेल्या एका अभियंत्याला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कुऱ्हाडीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोल्हेगाव रस्ता परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. या हल्ल्यात सुबोध संजय फुंदे (वय ३२, रा. सूर्यनगर, शनि पॅलेस हॉटेलजवळ, अहिल्यानगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुबोध फुंदे हे व्यवसायाने अभियंता (इंजिनिअर) असून नगर शहर आणि सावेडी परिसरात त्यांच्या बांधकामाच्या साईट्स सुरू आहेत. मंगळवारी लेबर लोकांचा पगाराचा दिवस असल्याने त्यांनी सर्व ठिकाणचे पगार दिले. मात्र, बोल्हेगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या साईटवरील वॉचमनचा पगार द्यायचा राहिल्याने फुंदे रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तिथे गेले होते. त्यांनी तेथील वॉचमन दिलीप चंद्रभान पवार यांना बोलावून त्यांच्या पगाराची रोख रक्कम दिली.
त्यावेळी तिथे वॉचमनचे काही नातेवाईक आलेले होते. त्यातील एकाने फुंदे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. ‘तुम्ही माझ्याकडे कामाला नाही, मी तुम्हाला पैसे का देऊ?’ असे फुंदे यांनी विचारले. या गोष्टीचा राग आल्याने संबंधितांनी फुंदे यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत आरोपी सागर गोरख मांजरे याने सुबोध फुंदे यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. कुऱ्हाड लागल्याने फुंदे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.
फुंदे खाली पडल्यानंतर आरोपी मनोज गोरख मांजरे, करण पवार आणि इतर दोन अनोळखी इसमांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान करण पवार याने मारलेला दगड फुंदे यांच्या डाव्या बाजूच्या बरगडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. वॉचमन दिलीप पवार यांनी मध्यस्थी करत सुबोध फुंदे यांना आरोपींच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी ही माहिती मिळताच तपास सुरू केला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल इखे आणि सहाय्यक फौजदार थोरवे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


