नगरमध्ये 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त झालेल्या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. या तिघांचा मुकुंदनगरसह शहरातील विविध भागांत ड्रग्ज विक्री करण्यामध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने तिनही संशयित आरोपींना 24 जुलैपर्यंत कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
अली शकील शेख (वय 19, रा. गोविंदपुरा), दानिश फारूख शेख (वय 29, रा. जुना घासगल्ली) आणि कासिफ सज्जाद खान (वय 26, रा. जुना मुकुंदनगर) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यापूर्वी अटक करण्यात आलेले झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांच्या चौकशीतून या तिघांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कारवाई करून या तिघांना ताब्यात घेत अटक केली. रविवारी (19 जुलै) तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक सावेडी परिसरात गस्त घालत असताना मिस्किनमळा येथे एक कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता दोन जण घटनास्थळावरून पसार झाले, तर झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता सुमारे 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
याशिवाय पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एअर गन, मास्क, कटावणी तसेच दरोड्यासाठी वापरता येईल असे साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले. मंगळवारी संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ड्रग्जचा मूळ पुरवठादार कोण, शहरात ड्रग्जचा साठा कुठून आणला जातो, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच पसार असलेल्या जमीर निसार शेख आणि इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत तिन्ही संशयित आरोपींना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


