राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषातील बदलांची माहिती देत ही घोषणा केली. पण कर्जमाफीला कधी मुहूर्त लागणार याची प्रतिक्षा कायम आहे. 30 जून रोजीपर्यंत कर्जमाफी होणार होती. राज्यपालांची स्वाक्षरी झाली नसल्याचे निमित्त पुढे करत 5 जुलै असा मुहूर्त ठरला. तोही हुकला. आता अर्धा जुलै संपत आला आहे. कर्जमाफीची तारीख पे तारीख मिळत असल्याने शेतकरी वैतागला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरीच्या वारीदरम्यान कर्जमाफीची नवीन तारीख सांगितली आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी कर्जमाफीविषयी माहिती दिली. जुलै महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा दावा भरणे यांनी केला. पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आली. कर्जमाफीच्या निकषांमध्ये थोडाबहुत बदल झाल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. आता सरकार नवीन आश्वासन पाळते की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त दुसर्यांदा हुकला, त्यासाठी नवीन निकष कारणीभूत ठरला आहे. आयकर भरणारे शेतकरी किती? याचा डाटा केंद्र शासनाकडून मागवला आहे. हा डाटा येईपर्यंत कर्जमाफी देता येणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. त्यातच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जमाफीला विलंब होत असल्याचे समोर आले आहे.


