नगर-सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला ; रुग्णालयात उपचार सुरू

कर्जत -तालुक्यातील मांदळी गावच्या शिवारात नगर-सोलापूर महामार्गावर बुधवारी (दि.26) रात्री बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने खलबळ उडाली आहे. मांदळीतील पाटील ढाबा या हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे परतत असताना 10 ते 15 अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून दगड, लाठ्या, तलवार, पिस्तूल व सत्तूरसारख्या शस्त्रांनी खाडे व त्यांच्या सहकार्‍यांवर अचानक हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तीन ते पाच समर्थकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर राम खाडे यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तत्काळ पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.हल्ल्यादरम्यान स्वसंरक्षणार्थ खाडे यांनी त्यांच्या जवळ असलेल्या पिस्तूलातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरून सत्तूरसह काही हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि.27) रात्रीपर्यंत फिर्याद दाखल झाली नव्हती. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना जखमींनी, आम्ही आमच्या भागात झालेल्या कामांच्या गैरकारभार आणि चुकीचे काम उघड केले. त्यामुळे राजकीय हेतूने आमच्यावर हल्ला झाला, असा आरोप केला. हल्ला कोणी केला आहे हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी खाडे यांच्या इनोव्हा कारचेही नुकसान केले. गाडीचे आरसे व दरवाजे फोडण्यात आले असून आतमध्ये दगड सापडले आहेत. मिरजगाव पोलिसांनी कार पोलीस स्टेशनमध्ये आणली आहे.

राम खाडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून त्यांच्या कारचेही नुकसान झाले आहे. कार पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे. आम्ही रुग्णालयात जाऊन काही जखमींशी चर्चा केली. त्यांनीच याप्रकरणी राम खाडे हे फिर्यादी होणार असल्याचे सांगितले, मात्र अद्याप कोणतीही लेखी फिर्याद प्राप्त झालेली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
– विजय झंझाड, पोलीस उपनिरीक्षक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles