Wednesday, November 12, 2025

नगर जिल्ह्यात मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्ह्यात लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
मुलींच्या जन्माविषयी व्यापक जागृती करत ग्रामसमित्या स्थापन करा
अहिल्यानगर, दि. २२ : जिल्ह्यात मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण समान ठेवण्यासाठी मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून मुलींच्या जन्माविषयी अधिक व्यापक जागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, विधी समुपदेशक ॲड. सारीका सुरासे आदी उपस्थित होते.
ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून जागृती करा
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे ते समान करण्यासाठी अधिक जागरूकपणे काम करणे गरजेचे आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि इतर ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून कृती आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावणी करावी. अनधिकृतपणे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करून कारवाई करावी.”
रुग्ण उपचारापासून वंचित राहू नयेत
पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांची माहिती घेऊन त्या गावांतील गरोदर माता व रुग्णांना शासकीय दवाखान्यात आणण्याची व्यवस्था करावी. शासकीय दवाखान्यांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा ठेवून एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जन्म-मृत्यू नोंदी वेळेत घ्या
जिल्ह्यातील जन्म व मृत्यूची नोंद वेळेत व्हावी, यासाठी खाजगी दवाखान्यांमध्ये आरोग्य सेवक नेमावेत. आरोग्य सेवकांनी नियमित भेटी देऊन नोंदी संकलित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
गृहभेटींद्वारे आरोग्य तपासणी करा पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्र आणि मोठ्या गावांमध्ये गृहभेटींचे नियोजन करून नागरिकांची तपासणी करावी. डास निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणी, साचलेले पाणी हटवणे व निर्जंतुकता राखण्यावर भर द्यावा. खाजगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
क्षयरुग्णांसाठी ‘लवकर निदान, योग्य उपचार’ पद्धत राबवा संशयित क्षयरुग्णांचे लवकर निदान व योग्य उपचार होणे हे क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी झोपडपट्ट्या, ऊसतोड कामगार वसाहती, औद्योगिक क्षेत्रे अशा ठिकाणी तपासणीची संख्या वाढवावी. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करावेत आणि प्रत्येक रुग्णाची नोंद ‘निक्षय’ पोर्टलवर करावी, असे निर्देशही दिले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागप्रमुख आणि तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles