अमरनाथ यात्रेच्या नावाखाली फसवणूक; नगर तालुक्यातील ’टूर अँड ट्रॅव्हल्स’ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नगर -अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेचे तसेच हेलिकॉप्टर प्रवासाचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दिनेश पोपट भोर (रा. वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत स्मिता अनिल शितोळे (रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी दिनेश भोर हा आमच्या दुकानावर आला.

मार्च 2025 मध्ये त्याने सांगितले की त्याचा ’बाबा अमरनाथ’ या नावाने टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यानंतर जुलै 2025 मध्ये अमरनाथ, वैष्णोदेवी व अन्य धार्मिक स्थळांच्या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. तुम्हाला हेलिकॉप्टरने दर्शनासाठी घेऊन जाऊ, कोणताही त्रास होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देऊन आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणींचा विश्वास संपादन केला.

आरोपीने हेलिकॉप्टर प्रवासासह प्रति व्यक्ती 32,500 रुपये आणि वाहनानेे जाणार्‍यांसाठी 26,500 रुपये असा खर्च ठरवून आरोपीने 7 महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 8 जणांकडून वेळोवेळी दोन लाख 56 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी आरोपी दिनेश भोर याने आयोजक आजारी असल्याने सहल रद्द झाली आहे, मी तुमचे पैसे परत करतो, असे सांगितले.

मात्र, त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी चौकशी केली असता, संबंधित भागात हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर सेवाही बंद झाली असल्याचे समोर आले. वारंवार पैशांची मागणी करूनही आरोपीने रक्कम परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार नेटके करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles