‘धर्मवीर गडा’वरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटींचा निधी मंजूर!

धर्मवीर गडावरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटींचा निधी मंजूर….

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ऐतिहासिक धर्मवीर गडाच्या संवर्धनाला मिळणार गती

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने यासंदर्भात प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यामुळे धर्मवीर गडाच्या संवर्धनाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी धर्मवीर गडाच्या विकासासाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे संवर्धन, जतन आणि विकास व्हावा, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना साजेसे स्मारक उभारले जावे, यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने १२ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार जिल्हा नियोजन समिती, नाशिक अंतर्गत प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामांसाठी उपलब्ध निधीतून धर्मवीर गड, पेडगाव येथील कामाचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी अतूट नाते सांगणारा ऐतिहासिक वारसा आहे. संगमेश्वर येथे पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पेडगावच्या या गडावर आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या स्मृतींशी जोडलेल्या या भूमीचे जतन करणे ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. धर्मवीर गडाच्या विकासासाठी मोठ्या आराखड्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू असून, गडाला ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

धर्मवीर गडाच्या जतन-दुरुस्तीमुळे गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्मारकाच्या उभारणीच्या दृष्टीनेही हा निधी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेला ५ कोटींचा निधी हा धर्मवीर गडाच्या संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक भूमीचे वैभव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

धर्मवीर गडाचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना साजेसे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रयत्नांना आता नवी दिशा मिळाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles