जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत गणेशमुर्तीला ‘मायक्रो लेस’ ची सजावट
सलग २५ वर्ष विविध वस्तुंपासून मुर्ती घडविण्याचा कर्मचाऱ्याचा अनोखा विक्रम
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कार्यालयात गेल्या २५ वर्षांपासून अनोख्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोसायटीमध्ये श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली असून सोसायटीतील कर्मचारी संतोष हरबा यांनी यावर्षी मायक्रो लेस वापरून गणपती बाप्पाची साडेचार फुट उंचीची मुर्ती साकारली आहे.
संतोष हरबा यांनी दोन महिने मेहनत करीत श्री गणरायाची मुर्ती सजविली आहे. गणपतीची अनोखी सेवा करण्यातून मोठे समाधान मिळते असे संतोष हरबा सांगतात. विघ्नहर्त्या गणरायाची विविध रूपे प्रत्येकाला मोहित करीत असतात. जि.प.कर्मचारी सोसायटीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले हरबा हे आपले दैनदिन कामकाज संभाळून दोन महिने आधीच गणपतीची तयारी करतात. मोठी मूर्ती घेवून मूर्तीला वेगळ्या पद्धतीने कल्पकतेने सजवतात. गेल्या २४ वर्षापासून ते वेगवेगळ्या सजावटीचे गणपती साकारतात या उपक्रमाची सुरुवात त्यांनी सन २००१ च्या गणेशोत्सवा पासून केलेली.
दर वर्षी अनोख्या पद्धतीने गणेश मूर्ती सजावटीचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यापूर्वी स्टॉ, डिस्को मनी, थर्मकॉल गोळी, कडधान्य, उपवासाचे पदार्थ, लोकर कुंदन खडे, खोबरा कीस, गरम मसाला, काडेपेटीतील काडी, चमकी, सुपारी, काचा, शर्टच्या गुंड्या, १ रुपयाची नाणी, चिंचोके, तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेली कवडी अशा विविध वस्तूपासून त्यांनी श्रीगणेश मूर्तींची सजावट केलेली आहे.
संतोष हरबा यांनी सजविलेली गणेशमूर्ती त्यांच्या एका मित्राने थेट अमेरिकेत नेली आहे. ती घरात स्थापन केली आहे. हरबा यांच्या आगळया वेगळ्या छंदाची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. आजपर्यंत विविध अशा ९ पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. माझ्या कलेला संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक, व्यवस्थापक, उप व्यवस्थापक सर्व कर्मचारी, सभासद यांचे कायम सहकार्य असते, असे ही हरबा यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीत गणेशमुर्तीला ‘मायक्रो लेस’ ची सजावट
- Advertisement -


