जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत मागणी घटल्याने भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदीचा दर देखील मोठ्या प्रमाणावर खाली आला आहे. ऐन सणासुदीत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महिन्यांनंतर १० ग्रॅम सोन्याची किंमत १,५०,००० च्या पातळीवर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्षभर सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन आणि सोने-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट केल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंडियन बुलियन वेबसाईटनुसार, आज बुधवार, १० जून २०२६ रोजी सोन्याची किंमत २२२० रुपयांनी घसरली असून, आता २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १,५०,३८० रुपये इतका झाला आहे. सोने १,८०,००० या सर्वकालीन उच्चांकापेक्षा २९,६२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष वाढल्याने चांदीची औद्योगिक मागणी घसरल्याने किमती सातत्याने घसरत आहेत. आज चांदी ३०१० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या प्रति किलो चांदीचा दर २,३६,००० रुपये झाला आहे. २९ जानेवारी २०२६ मध्ये चांदीने ४,००,७८० रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. म्हणजे उच्चांकापेक्षा चांदीचे दर १,६४,७८० रुपयांनी कोसळले आहेत.
मागील एका आठवड्यात सोन्याची किंमत ५.१६ टक्के इतकी घसरली असून एक तोळ्याचे दर तब्बल ८११० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. चांदीने घसरणीच्या बाबतीत रेकॉर्ड मोडला आहे, आठवड्यात चांदी १०.१२ टक्के इतकी स्वस्त झाली आहे. म्हणजे आठवड्यात चांदीच्या किमती २७,७८० रुपयांनी घसरल्या आहेत.


