अहिल्यानगर -प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा यांची अवैध वाहतूक करणार्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत 11 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी (14 जुलै) दुपारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एक चारचाकी वाहन अवैधरित्या गुटख्याचा साठा घेऊन येणार आहे. तात्काळ कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.पथकाने आंबेडकर पुतळा, मार्केट यार्ड चौक येथे सापळा रचून संशयित वाहनाला थांबवले. छाप्यात वाहनातून दोन इसम आढळले. त्यांनी आपली नावे जुबेर वाहीद जौहर शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) आणि शंकर विलास नेटके (रा. नालेगाव, अहिल्यानगर) अशी सांगितली. चौकशीअंती त्यांच्याकडील वाहनाची झडती घेतली असता, प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण 11 लाख 7 हजार 550 रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सेदवाड, अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सूर्यकांत डाके, विजय काळे, अभय कदम, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने ही कारवाई केली.


