आजोबाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या ; नेवासा तालुक्यातील धक्कादायक घटना

नेवासा-ट्रॅक्टरचे साऊंडचा आवाज कमी कर असे म्हणाल्याचे कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून सौंदाळा येथील तरुणाने चुलत आजोबाच्या (आईचे चुलते) अंगावर ट्रॅक्टर घातल्याने 59 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सोमनाथ संभाजी साळुंके (वय 36), धंदा-शेती रा. सौंदाळा ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मी, वडील संभाजी आसाराम साळुंके (वय 59), आई, पत्नी, दोन मुले असे कुटुंबासह एकत्र राहतो. तसेच माझे शेजारी विशाल नंदु आरगडे हा त्याचे कुटुंबासह राहवयास आहे. त्याचेकडे महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक माहीत नाही) आहे. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास माझे वडील संभाजी हे रानात शेळ्या चारून शेळ्या घेऊन आले. त्यावेळी विशाल याने त्याचे ट्रॅक्टरचा साऊंडचा आवाज मोठा केल्याने शेळ्या बाजूला पळाल्याने वडील संभाजी हे विशाल यास तू तुझ्या ट्रॅक्टरचे साऊंडचा आवाज कमी कर असे म्हणाल्याचे कारणावरुन विशाल आरगडे व वडील संभाजी यानी एकमेकांना शिवीगाळ दमदाटी केली होती.

विशाल नंदु आरगडे याने वडील संभाजी यांना मी तुला माझे ट्रॅक्टर खाली घालून मारून टाकीन अशी धमकी दिली होती. परंतु वडील संभाजी यांनी त्यांना शिवीगाळ व दमदार्टी झाले बाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. आज दि. 13 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास माझे वडील संभाजी आसाराम साळुंके हे आमची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 16 पी 6351) ही घेऊन भेंडा येथील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले. त्यानंतर 7:30 वाजेच्या सुमारास मला चुलतभाऊ दादासाहेब मोहन साळुंके याने फोन करुन सांगितले की, वडील संभाजी यांना भारत पेट्रोलपंप भेंडा येथे विशाल नंदु आरगडे याने कालचे भांडणाचे कारणावरुन त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर चालवून वडील संभाजी यांचे अंगावर घालून त्यांना गंभीर जखमी करुन ट्रॅक्टर घेऊन तेथून पळून गेला आहे असे सांगितले. त्यानतंर भेंडा येथे पेट्रोल पंप येथे जावून पाहिले असता वडील संभाजी यांचे दोन्ही पायाला गंभीर जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला दिसला.

त्यानतंर मी, भाऊ दादासाहेब व जमलेल्या लोकांच्या मदतीने वडील संभाजी यांना अ‍ॅम्बुलन्स मध्ये नेऊन साई सेवा हॉस्पीटल नेवासा फाटा येथे दाखल केले. साई सेवा हॉस्पीटल येथे डॉक्टरांनी वडील संभाजी यांचेवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारकामी अहिल्यानगर येथे घेवून जाण्यास सांगितले.
त्यानतंर आम्ही वडील संभाजी आसाराम साळुंके यांना अहिल्यानगर येथे उपचारकामी अ‍ॅम्बुलन्सने घेऊन जात असताना ते बेशुध्द झाले. त्यानतंर आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे 12:10 वाजेच्या सुमारास उपचाराकामी घेऊन आलो असता तेथील डॉक्टरांनी संभाजी आसाराम साळुंके यांना तपासून ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.

वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून केला म्हणून माझी विशाल नंदु आरगडे रा. सौंदाळा याचे विरुध्द तक्रार आहे. या तक्रारी वरून नेवासा पोलीस ठाण्यात गु र.नं.0766/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles